५ वर्षीय बालीकेवर अत्याचार करणार्या आरोपिस २० वर्ष सश्रम कारावास

0
297

विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांचा न्यायनिर्वाळा

  • लोकवृत्त न्यूज 
    गडचिरोली, २४ ऑगस्ट : पाच वर्षीय बालीकेवर एकटी असल्याचा फायदा घेवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस गडचिरोली विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. चतुर उर्फ चेतन मारोती मेश्राम (२३) रा. वाकडी ता.चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.
    प्राप्त माहितीनुसार, घरात कोणीही नसतांना आरोपीने याचा फायदा घेत १४ जुलै २०१९ रोजी ५ वर्षीय बालीकेवर अत्याचार केला. पिडीतेची आई सांयकाळी शेतातून घरी आल्यानंतर पिडीताने सर्व झालेला प्रकार आईला सांगितला. पिडीतेच्या आईने १५ जुलै २०१९ रोजी पोलीस स्टेशन चामोर्शी गाठून तक्रार दाखल केली असता पोलीसांनी कलम ३७६ (अ,ब) भादवी व कलम ४,६ बालकाचे लैंगिक अत्याचार कायदयान्वये गुन्हा नोंद केला व आरोपी चतुर उर्फ चेतन मारोती मेश्राम याला अटक केली.
    पुढील तपास पोलीस विभागाने करून आरोपी विरूध्द सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. तक्रारदार व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून आज २४ ऑगस्ट २०२२ रोजी आरोपी चतुर उर्फ चेतन मारोती मेश्राम यास विशेष जिल्हा सत्र न्यायाधिश यु.एम.मुधोळकर यांनी कलम कलम ३७६ (अ,ब) भादवी व कलम ४, ६ बालकाचे लैंगिक अत्याचार कायदयान्वये दोषी ठरवुन २० वर्ष सश्रम कारावास व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर दंडाची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
    या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हयाचा तपास चामोर्शी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी केला. तसेच संबंधित प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमिका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here