लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.25ऑगस्ट:- बैलाचा पोळा हा विशेषतः गावात साजरा होणारा सण आहे. या सणानिमित्त दारू पिऊन सणाचे पावित्र्य भंग न करता यंदाचा पोळा दारूमुक्त करा, असे आवाहन मुक्तिपथ गाव संघटनांच्या वतीने करण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये बॅनर व गावकऱ्यांशी चर्चा करून दारूमुक्त पोळ्याचे महत्व पटवून दिले जात आहेत.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या सणाला काही गावांत दारू गाळून विक्री केली जाते. यामुळे अनेक दिवसांपासून गावात बंद असलेली दारू पोळ्याच्या निमित्ताने सुरु होण्याची शक्यता असते. दारू सुरु झाली की, पुन्हा गावातले वातावरण बिघडते. या दिवशी दारू पिऊन अनेक जण सणाचे पावित्र्य घालवतात आणि गावातील शांतता भंग करतात. गावात तंटे निर्माण होतात. यासाठी दरवर्षी प्रमाणे ‘दारूमुक्त पोळा’ आपल्या गावात साजरा करावा. या उद्देशाने गावागावातील गाव संघटनांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार गावातील मुख्य चौकात बॅनर लावून लोकांचे लक्ष वेधले जात आहेत. सोबतच गावकऱ्यांशी चर्चा करून दारूमुक्त पोळा करून गावात शांतता कायम ठेवण्याचे आवाहन गावसंघटना द्वारा केल्या जात आहे.