-सगणापूर येथे समिती पुनर्गठित
लोकवृत्त न्युज
गडचिरोली दि.30 ऑगस्ट :- ग्रामपंचायत अंतर्गत दारू विक्री करणाऱ्यांवर ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सगणापूर ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.
मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यासंदर्भातील बैठक सरपंच पार्वताबाई कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच रेवती पोरटे, सचिव एम. जे. निकुरे, अंगणवाडी सेविका रंजना चौखुंडे, आशा स्वयंसेविका नीता पाल, ग्रापं सदस्य सुनील कन्नाके, पोलिस पाटील तन्वी कोडापे, पत्रु पोरटे, सुभाष चुनारकर, प्रकाश गेडाम, पांडुरंग पोरटे, मोहनदास भाकरे, चरणदास पोरटे उपस्थित होते
यावेळी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी समजावून सांगितले. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई व मुजोर दारूविक्रेत्यांना तडीपार करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी स्पार्कचे प्रियंका भुरले उपस्थित होत्या.