लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ( Gadchiroil ) दि. 12 सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील सोमनपुर येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना नोटीस बजावले आहे. सोबतच जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून दारू अड्डे उध्वस्त करीत ३० हजारांचा सडवा, साहित्य व दारू नष्ट केली आहे. या कृतीमध्ये गावातील ६० महिलांनी सहभाग घेतला होता.
जंगलव्याप्त भागात वसलेल्या सोमनपुर गावात अवैधरित्या दारूविक्री केली जाते. यामुळे महिलांना कौटुंबिक त्रास सहन करावे लागत आहे. दारूविक्रीमुळे होणारे गावाचे नुकसान लक्षात घेत, गाव संघटनेच्या महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्याचे ठरविले. त्यानुसार मुक्तीपथ टीमने प्रत्यक्ष गावात जाऊन गाव संघटनेची बैठक घेतली. बैठकीदरम्यान दारूविक्रीमुळे कुटुंबात वादावाद, मारहाण असे प्रकार घडत असल्याचे महिलांनी सांगितले. अशातच दारूविक्री बंद असलेल्या ठाकूरनगर गावातील संघटनेच्या महिला, पोलीस पाटील यांच्या सहकार्याने अहिंसक कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दोन्ही गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या जंगलपरिसरात शोध मोहीम राबवून ३० हजारांचा मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट करण्यात आली. सोबतच गावातील विक्रेत्यांना नोटीस देण्यात आली. यावेळी संबंधित दारू विक्रेत्यांनी यापुढे अवैद्य दारूचा व्यवसाय करणार नाही अशी हमी दिली. या मोहिमेत ठाकूरनगर गाव संघटनेचे अध्यक्ष काली मंडल, सचिव ललिता साना, सदस्या माधुरी मिस्त्री, सुसुम सरकार, पोलीस पाटील हलदार तसेच सोमनपुर येथील अध्यक्ष शकुंतला सरवर, जयश्री आत्राम यांच्यासह ६० महिला व तालुका संघटक आनंद इंगळे, प्रियंका भूरले हे उपस्थित होते .