–गावकऱ्यांनी दुचाकीसह दारू केली जप्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 14 सप्टेंबर : कुरखेडा तालुक्यातील नवरगाव येथील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करणे गोंदिया जिल्ह्यातील ठोक विक्रेत्याला चांगलेच महागात पडले आहे. गाव संघटनेच्या महिला व गावकऱ्यांनी मंगळवारी संयुक्त कृती करीत त्याच्याकडील दुचाकीसह देशी दारू जप्त केली.
नवरगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गावसंघटनेच्या महिलांसह गावकरी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील कढोली येथील ठोक विक्रेता गावातील काही किरकोळ विक्रेत्यांना देशी दारू पुरवठा करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पाटील, गावसंघटनेच्या महिला व गावकऱ्यांनी गावात दाखल झालेल्या ठोक दारूविक्रेत्याची दुचाकी थांबवून झडती घेतली असता, 2 हजार रुपये किमतीचे 40 देशीचे टिल्लू आढळून आले . संपूर्ण दारू नष्ट करीत दुचाकी गावकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच संबंधित दारू विक्रेत्यावर 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, संबंधिताने दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यामुळे जोपर्यंत दंड देणार नाही तोपर्यंतच दुचाकी घेणार नाही , असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना दारू सप्लाय करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. यावेळी पोलीस पाटील, जगदीश मानकर, देवा कवाडकर, उदाराम कवाडकर, नारायण नाकाडे, रमेश पिलारे, आशा उईके, मुक्तीपथ तर्फे मयूर राऊत, कान्होपात्रा राऊत, गावसंघटनेच्या महिला व गावकरी उपस्थित होते.