विविध गावात शिबीर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि 17 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी सर्च मधील मानसिक आरोग्य विभागातर्फे विविध गावात मानसिक रोगांवर उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण ६८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत मानसिक आजारामधून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.
धानोरा तालुक्यातील मेंढा(लेखा) येथील शिबिरात ४९ रुग्णांनी उपचार घेतला तसेच साखेराटोला इथे १९ रुग्णांनी उपचार घेतला. धानोरा तालुका स्थित चातगाव येथे असलेल्या “सर्च” मधील ‘माँ दंतेश्वरी दवाखानाच्या’ माध्यमातून मानसिक आजारांवर ओपीडी सुरु आहे. पण जर एखाद्याला दवाखान्यापर्यंत येणे शक्य नसेल तर मानसिक आरोग्य विभागाची पूर्ण टीम मिळून ग्रामीण भागात जाऊन या विषयावर काम करत आहे. या एक दिवसीय मानसिक उपचार क्लीनिकला मानसोपचार तज्ञ स्वत: डॉ. आरती बंग उपस्थित राहून उपचार प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी मेंढा लेखा या गावातील सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा आणि साखेरटोला या गावात गाव पाटील सोनू पोटावी तसेच गावातील आरोग्यादूत यांचे खूप सहकार्य लाभले. तसेच समुपदेशक म्हणून अक्षय तिजारे, डॉ. मिताली श्रॉफ, स्नेहल आरोटे, प्राजक्ता मेश्राम, प्रमोद कोटांगले यांची उपस्थिती या शिबिरात होती. गावातील नागरिकांच्या मदतीने हे शिबीर यशस्वितेने पार पडले.
मानसिक आरोग्याची लक्षणे :खूप बेचैन असणे, सारखी चिंता, भीती वाटणे, अंगाचा थरकाप होणे, कानात आवाज ऐकू येणे, स्वतःशीच बोलणे, खूप जास्त उदास-निराश राहणे, कामात लक्ष न लागणे, सतत दारू पिणे यापैकी कोणतीही लक्षणे जर तुमच्यात किंवा गावातील इतर नागरिकांमध्ये असल्यास तुमच्या गावातही माँ दंतेश्वरी दवाखानाच्या मानसिक आरोग्य विभागाच्या वतीने शिबीर आयोजित करण्यात येते. आपल्या गावात मानसिक उपचार क्लिनिक शिबीर आयोजित करायचे आल्यास या 8806211157 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सर्च च्या मानसिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.