लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 6 डिसेंबर: प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनियर कॉलेज गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी २३व्या राज्य स्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत भाग घेऊन तब्बल १४ सुवर्णपदके आपल्याकडे खेचून आणलीत.
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, खेलो इंडीया व भारतीय क्रीडा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेली महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद द्वारा मान्यताप्राप्त ही स्पर्धा नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलमध्ये दिनांक १ ते ४ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले होते.
प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनियर कॉलेज गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी १४ सुवर्णपदकांसह एकूण १७ पदके या स्पर्धेत मिळविली. यात कु. एंजल देवकुळे हिने सर्वाधिक ३ सुवर्णपदक प्राप्त केलीत. त्याखालोखाल ओम धोटे, ओम बोंद्रे, कु. ओवी गद्देवार व अर्जुन भुयार यांनी प्रत्येकी २ सुवर्णपदक मिळवीत स्पर्धेत आपलीही छाप सोडली. तर कु. अवनी धोडरे, कु. गुंजन वासेकर व कु. दिया कोहळे यांनी प्रत्येकी १ सुवर्णपदक जिंकत सुवर्णपदक विजेत्यांमध्ये आपलेही नाव कोरले. तसेच कु. संस्कृती चन्नावार हिने १ रौप्य व १ कांस्यपदक घेऊन तर सोहम चिलमवार याने १ रौप्यपदक जिंकून स्पर्धेमधील आपले कर्तृत्व सिद्ध केले.
स्पर्धेतील फाईट आणि ग्रुप इवेन्ट मध्ये सर्वोत्कृष्ट तंत्रशुद्ध खेळ सादर करणारे खेळाडू म्हणून नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. केवळ गडचिरोली शहर नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
सर्व सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची दिनांक ३० डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान जम्मू येथे खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव अझिझ नाथानी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. खेळाडूंनी आपला सराव सुरु ठेवून राष्ट्रीय स्तरावर सुद्धा असेच विजेतेपद घेऊन यावे अशा शुभेच्छा देत अझिझ नाथानी यांनी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. तर खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक संदीप पेदापल्ली यांनी आपल्या प्रदर्शनामध्ये सातत्य राखून ठेवले आहे आणि तेच सर्वांच्या यशाचे गमक आहे अशा शब्दात प्लॅटिनम ज्युबिली स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य रहिम अमलानी यांनी विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.