– दोषींवर कारवाई करण्याची हयगय भोवली
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २२ फेब्रुवारी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वनजमिनीवर भुमाफीयांनी अतिक्रमण करून लेआउट पाडून भुखंड विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. मात्र या प्रकरणातील दोषींवर कारवाई करतांना हयगय केल्याने येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना अलगट आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आयटीआय ते गोकुळनगर बायपास मार्गावर असलेल्या सर्वे क्र. २१ मधील १.२९ हेक्टर वनजमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण करून लेआउट पाडून भुखंड विक्री सुरू केली होती. हे प्रकरण उघडकीस येतात यावर वनपरिक्षेत्र अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी थातुरमातुर कारवाई केली. या प्रकरणाला ८ ते १० महिने कोणतीही ठोस कारवाई झाली नाही या कालावधीत भुमाफियांनी अनेकांना भुखंडाची विक्री सुध्दा केली. सदर प्रकरण पुन्हा उजेडात आल्यानंतर वन प्रशासन जागे झाले व सक्त कारवाई करत सदर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवून जमीन ताब्यात घेतली होती. मात्र सदर प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी पेंदाम यांनी प्रकरणाचा योग्य तपास न करता दोषींवरील कारवाईत हयगय केल्याचा ठपका ठेवत वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी चौकशीअंती पेंदाम यांना निलंबित केले आहे.
तर या प्रकरणातील दोषींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी यांचाही समावेश असल्याचे कळते त्यामुळे सदर प्रकरणाला वेगळे वळण येणार काय ? याकडे आता लक्ष लागले आहे.