कुरखेडा तहसील कार्यालयासमोरील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

0
336

रुग्णालयात केले दाखल

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली , १६ मार्च : कुरखेडा तहसील कार्यलयासमोर कुंभिटोला येथील अवैध रेती उपसा, विटभट्टी प्रकरणी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते राजू मडावी यांची प्रकृती आज १६ मार्च रोजी रात्रो ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास खालावल्याची माहिती पुढे येत असून उपोषणकर्ते राजू मडावी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही कळते.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला अवैध रेती उपसा व गावात असलेल्या अवैध वीटभट्टी धारकांवर निवेदन देऊन कारवाई करण्याची विनवणी गावकऱ्यांनी केली मात्र त्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने शेवटी उपोषणाचे शस्त्र हाती घेत सोमवार १३ मार्च २०२३ पासून कुरखेडा तहसील कार्यलयासमोर कुंभिटोला येथील चेतन गहाणे व राजू मडावी हे उपोषणास बसले. आज उपोषणाचा चौथा दिवस असून प्रशासनामार्फत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र आज रात्रोच्या सुमारास उपोषणकर्ते राजू मडावी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर उपोषणास त्यांच्या साथीला असलेले चेतन गहाने हे अद्यापही उपोषणस्थळी असून आपल्या मागण्याच्या ठाम भूमिकावर आहेत. तर उपोषण सुरू असल्याने प्रकरणाची चौकशी झाल्यास आपल्यावर कारवाई होणार असे कळताच संबंधित महिला तलाठी यांनी उपोषणकर्त्यांना ‘मी निलंबित झाल्यास सर्वांची वाट लावणार, घरी येऊन आत्महत्या करेल’ अशी धमकीफोनद्वारे दिली होती. दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे. यामुळे आता पुन्हा प्रकरण चांगलेच तापले आहे. याबाबत उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here