लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ३१ मे :- जागतिक तंबाखुविरोधी दिवसाच्या निमित्ताने खर्रा व तंबाखूमुक्तीची शपथ घ्या व व्यसनांना नाही म्हणा, असे आवाहन मुक्तिपथ अभियानाद्वारे करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील पुरुषांसोबतच महिला व मुलांमध्येही खर्रा खाण्याचे प्रमाण जास्त आहे. तंबाखु सेवनाला लोकांनी नकार द्यावा, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे ३१ मे जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तसेच यापुढे नियमितपणे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथक सक्रीय राहील. कायद्याचे उल्लंघन करीत तंबाखूविक्री करताना आढळल्यास त्या व्यक्तीवर, किराणा, पानठेला, होलसेल किंवा किरकोळ विक्रेता असल्यास पथकाद्वारे कायदेशीर तपासणी करून कारवाई केली जाईल. खर्रा हा तंबाखूजन्य पदार्थ आहे. सुगंधित तंबाखूचा वापर करून खर्रा तयार केला जातो. सुगंधित तंबाखूबंदी कायदा २०१२ नुसार खर्रावर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी आहे. राजरोसपणे सर्वत्र विक्री केली जाते. शहरासह, ग्रामीण भागात अनेकांना खर्रा सेवनाचे दुष्परिणाम बघायला मिळतात. कोणाचे तोंड नीट उघडत नाही, साधे दोन बोट तोंडात जात नाही, काहींना तर तोंडाचा कर्करोगही झाला आहे. मोठ्यांचे पाहून लहान मुलेसुद्धा अनुकरण करत आहेत. त्यामुळे तंबाखूविरोधी दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी, शासकीय व खासगी कार्यालयांच्या व सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी खर्रा न खाण्याचा संकल्प घेऊन तंबाखूला नकार द्यावा, तसेच सर्व पालकांनी आपले बघून आपला पाल्य खर्रा खायला तर लागला नाही. याची खात्री करावी व किमान आपल्या मुलाला, मुलीला तरी खर्रा, तंबाखूपासून वाचवावे, असे आवाहन मुक्तिपथ व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम गडचिरोली जिल्हा सेलद्वारे करण्यात आले आहे.