९ वर्षांच्या कार्यकाळातील कामे घराघरांत पोहोचवा : डॉ. उपेंद्र कोठेकर

0
107

गडचिरोली : मार्गदर्शन करताना संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ३१ मे :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना ३० मे ते ३० जुन पर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण बूथ स्तरापर्यंत यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षांच्या कार्यकाळात केलेली संपूर्ण कामे घराघरांत पोहचवून प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन भाजप विदर्भ प्रांत संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र महाजनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून या नियोजन कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली -चिमूर लोकसभा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या बैठकीला खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,लोकसभा संयोजक विरेंद्र अंजनकर, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, एसटी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, चंद्रपूर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात एकहाती सत्ता असताना ६० वर्षांमध्ये जेवढा विकास केला नाही तेवढा विकास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षाच्या कार्यकाळात तीन पटीने सर्व क्षेत्रात विकास केला आहे. ही सर्व विकासकामे जनतेच्या घराघरांमध्ये पोहोचविण्याचे कार्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे, २१ दिवस महा जनसंपर्क अभियानात एकाग्रतेने काम करून भारतीय जनता पक्षाच्या यशस्वी वाटचालीस सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. या सभेच्या सुरुवातीला चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत इतरही मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करत पक्षाची विकासकामे लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. बैठकीला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here