गडचिरोली : कार्यक्रमाला उपस्थित डॉ. दीपक नगराळे व इतर.
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १ जून : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानिमित्त आदिवासी उपयोजनेअंतर्गत नागपूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आणि सोनापूर-गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. हा प्रशिक्षण कार्यक्रम नागपूर केंद्रीय कापूस संशोधन संस्था येथील संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमास नागपूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. दीपक नगराळे, शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र) डॉ. शिवाजी एच. ठुबे, डॉ. उल्हास गळकाटे, विषय विशेषज्ञ (पशुविज्ञान) दिलीप मुर्धीलकर, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) निलीमा पाटील, विषय विशेषजज्ञ (कृषी अभियांत्रिकी) डी. व्ही. ताथोड, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) पी. ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (कृषी हवामानशास्त्र) एन. पी. बुद्धेवार, गुरवळाचे वनसंरक्षक गुरुनाथ वढाई, सुजित कुंभारे तसेच शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे, ताडपत्री व पाळीव जनावरांसाठी पोषण विटांचे वाटप कृषी निविष्ठा स्वरूपात करण्यात आले. डॉ. दीपक नगराळे यांनी आदिवासी उपयोजनेविषयी सविस्तर माहिती दिली. कापूस संशोधन केंद्राअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सुधारित बियाण्यांचा वापर करून खरीप पिकाद्वारे उत्पन्नात वाढ करावी आणि आपले आर्थिक स्तर उंचवावे, असे सांगितले. डॉ. शिवाजी ठुबे यांनी बीज प्रक्रिया, कापूस पिकावरील विविध किडी व रोगांचे व्यवस्थापन विषयक विशेष मार्गदर्शन केले. खरीप पिकांची घ्यायच्या काळजीविषयी मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास गळकाटे यांनी पशुधनाची घ्यायची काळजी याविषयी माहिती दिली. जनावरांचे लसीकरण आणि लम्पी आजाराची कारणे, घ्यायची काळजी याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. निलीमा पाटील यांनी पौष्टिक आहाराकरिता भाजीपाला पिकाचे महत्त्व उपस्थिताना सांगितले. त्याचप्रमाणे परसबागेमध्ये भाजीपाला पिकाची लागवड करण्याविषयी मार्गदर्शन केले. पी. ए. बोथीकर यांनी धानपिकांवर येणारे कीड व रोगाविषयी विशेष मार्गदर्शन केले. धानपिकाच्या अवस्था, कीड रोग व्यवस्थापन तसेच फवारणी करताना घ्यायची काळजीविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. एन. पी. बुद्धेवार यांनी कापूस तसेच धानपीक लागवड तंत्रज्ञानाविषयी विशेष मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे धानपिकाची बिजप्रक्रिया तसेच धानपीक लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले. डी. व्ही. ताथोड यांनी कृषी यांत्रिकीकरणाविषयी मार्गदर्शन केले.