लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ५ जून :- शहरातून सुगंधीत तंबाखूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने सापळा रचून वाहनासह ३ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार (ता. ४) दुपारी ३ वाजताच्या सुमारास केली. याप्रकरणी यशवंत विठ्ठल हर्षे (वय ४१ ) रा. गिलगाव याला अटक करण्यात आली आहे.
गिलगाव येथून कारद्वारे गडचिरोली शहरातील चिल्लर विक्रेत्यांना सुगंधीत तंबाखू पुरवठा होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने शहरातील आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्यावर सापळा रचला. दरम्यान, एमएच ३३ व्ही ५५६२ क्रमांकाची संशयीत कार येताना दिसताच पथकाने या कारला थांबवून तपासणी केली असता वाहनात २७ हजार रुपये किमतीचा सुगंधीत तंबाखू आढळून आला. पोलिसांनी ३ लाख ५० हजार रुपयांची कार व सुगंधीत तंबाखू असा एकूण ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी यशवंत हर्षे याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, परशुराम हलामी, तुषार खोब्रागडे, वृक्षाली चव्हाण आदींनी पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईने सुगंधीत तंबाखू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.