लोकवृत्त न्यूज
देसाईगंज, ६ जून :- राज्यात वारंवार ओबीसींना घटनादत्त अधिकार देण्याचे सूतोवाच करण्यात येते. मात्र, जातीनिहाय जनगणना करण्यात आली नसल्याने शासनाकडे ओबीसींची ठरावीक आकडेवारी किती हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. म्हणून राज्यात जातीनिहाय जनगणना करून कोणाची आकडेवारी किती हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही राज्यातील ओबीसींना घटनादत्त अधिकार मिळत नसून आजही अनेक क्षेत्रात गळचेपी होत आहे. बिहार राज्यात ओबीसींना यथोचित न्याय देण्यासाठी अशी मोहीम हाती घेण्यात आली असून जनगणना युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात याबाबत अद्याप कुठल्याच हालचाली दिसून येत नसल्याने ओबीसी वर्गात असंतोष खदखदू लागला आहे. आपल्या कार्यकाळात हे काम पूर्णत्वास जाऊन ओबीसींना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याकरिता बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने मुख्यामंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदन देताना गडचिरोली ओबीसी काँग्रेस कमिटी जिल्हा सचिव मनोज ढोरे, काँग्रेस कमिटीचे उप जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे, काँग्रेस युवा नेते पिंकू बावणे, नगरसेवक गणेश फाफट, हरीश मोटवानी, शहजाद, सागर वाढई, देसाईगंज काँग्रेस कमिटी उप तालुकाध्यक्ष नितीन राऊत, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण कुंबळवर, विलास बनसोड, जावेद शेख, सहील बुरडे, पराग शेंडे, विलास ठाकरे, सुप्रिया सहारे, कोहपारे, गणेश भोयर, आदित्य मिसार, सूरज ठाकरे, खुशाल राऊत व ओबीसी समुदायातील नागरिक उपस्थित होते.