लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १२ जून: माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ असताना २००५ मध्ये सुरू केलेल्या ‘संविधान ओळख’ उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या जागरूक नागरिक, जबाबदार सामाजिक संस्था, मीडिया प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
नागपूर येथील उरूवेला काॅलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात गुरुवार (ता. १५) दुपारी ३ वाजता या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे पोलिस उप महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सर्वांना सन्मानित करण्यात येईल. माजी सनदी अधिकारी व संविधान फाउंडेशनचे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या समारंभात आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अॅण्ड लिटरेचरचे अध्यक्ष दादाकांत धनविजय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संविधान ओळख उपक्रमासाठी व संविधानाच्या जाणीव जागृतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था-संघटना व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संविधान फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम कार्यान्वित केला असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. गुरुवारी होणाऱ्या समारंभात संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, भंडारा प्रा. युवराज खोब्रागडे, सूरज दहागावकर, नूतन माळी, अशोक कोल्हटकर, रूबीना पटेल, अॅड. अंजली साळवे, महेश मडावी, पत्रकार देवेश गोंडाणे, प्रा. राहुल मून, नरेश साखरे, जगजीत सिंह, रामभाऊ आंबुलकर, नितीन सरदार, अरविंद गेडाम, प्रफुल्ल शेंडे, वैभव शिंदे, खुशाल ढाक, रमेश धुमाळ, तुफान उईके, विशाल शुक्ला, रतन सिंह, जमीरभाई मदारी व प्रीती हजारे आदीचा सत्कार करण्यात येणार आहे. संविधान फाउंडेशनद्वारे आयोजित या सन्मान समारंभास सामाजिक संस्था, संघटना, कर्मचारी-अधिकारी संघटना, शाळा-महाविद्यालयाचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, शिक्षक-प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, सामाजिक सांस्कृतिक साहित्याचे क्षेत्रातील मंडळी, संविधान मित्र, संविधान दूत व संविधान प्रेमी नागरिकांनी मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संविधान फाउंडेशनच्या वतीने रेखा खोब्रागडे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, शिरीष कांबळे, नेहा खोब्रागडे, विजय बेले, अलका निरंजन, कल्पना कांबळे, विजय कांबळे, विभा कांबळे व छाया मेश्राम यांनी केले आहे.