लोकवृत्त न्यूज
देसाईगंज २६ जून : तालुक्यात पर्यायी गोडाऊन व्यवस्था उपलब्ध करून मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक विशाल कुरर्जेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देसाईगंज तालुक्यात यावर्षी रबी पिकामध्ये ७० टक्के शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी देसाईगंज तालुक्यातच मका खरेदी केंद्र सुरू करा, अशी होती. आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मका खरेदी सुरू झाली. पण अपुऱ्या गोडाऊनमुळे आता मका खरेदी पूर्णपणे बंद पडली आहे. अजूनही शंभरच्या वर शेतकऱ्यांकडे मका घरीच पडून असून शेतकरी गोडाऊनच्या प्रतीक्षेत आहेत. देसाईगंज तालुक्यात एकमेव शासकीय मका खरेदी केंद्र सुरू झाले. पण शासकीय गोडाऊन मात्र, खरेदी उद्दिष्टाच्या तुलनेत लहान झाल्याने गोडाऊन फुल्ल झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची आता अडचण झाली आहे. तत्काळ गोडाऊन उपलब्ध करून दिले नाही, तर मका खराब होण्याच्या स्थितीत आला आहे. उशिरा खरेदीमुळेसुद्धा खरेदी संस्थांचीसुद्धा डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक विशाल कुर्जेकर व शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे गोडाऊन उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.