लोकवृत्त न्यूज
धानोरा २९ जून : तालुक्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी गडचिरोली येथे जाण्याऐवजी धानोरा येथे एका कर्मचार्याची तात्पुरती नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांना इथेच पास मिळेल व आर्थिक भुर्दंड ही पडणार नाही. त्यामुळे एका कर्मचार्याची तात्पुरती नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
नुकतेच दहावी व बारावी परीक्षेचे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी धानोरा येथे येत आहेत. तसेच लगेच ३० जूनपासून पहिली ते पदवीपर्यंतच्या शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत. यासाठी विद्यार्थी शाळेत व महाविद्यालयात बसगाडीने येत असतात. विद्यार्थ्यांना बस पास काढण्यासाठी गडचिरोली येथे जावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड पडतो. धानोरा तालुक्यातील विद्यार्थी गरीब घरचे आहेत. त्यामुळे धानोरा येथे एका कर्मचार्याची तात्पुरती नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. दरवर्षी कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत असते. परंतु, त्यांच्या मागणीला गडचिरोलीच्या राज्य परिवहन महामंडळाकडून केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी परिवहन महामंडळाबद्दल रोष व्यक्त केला आहे.