लोकवृत्त न्यूज
आरमोरी ३० जून : शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली. ही घटना दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. शारदा नामदेव खोब्रागडे (३२ वर्ष) असे सदर शिपायाचे नाव आहे. ती मुळची सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील रहिवासी असून सध्या भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे.
शारदा खोब्रागडे यांनी पुलावर आपली दुचाकी उभी केली. तिथेच मोबाईलसुद्धा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिकडे धाव घेतली. सोबत आरमोरी तहसील कार्यालयाच्या बचाव पथकाच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात संध्याकाळपर्यंत शोध घेतला, पण थांगपत्ता लागला नाही. वैनगंगा नदीच्या पुलावर यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विशेष म्हणजे आतापर्यंत वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी पातळी खालावलेली होती. पण गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे शारदा खोब्रागडे नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना, अशी भिती व्यक्त केली जात होती.परतु रात्रौ ९: ३० च्या दरम्यान शारदा खोब्रागडे या महिला पोलीस शिपाई चा श्यव मिळाला आहे. त्या अविवाहित होत्या असे समजते. त्यांनी या पद्धतीने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.