लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 21 जुलै : गत पाच दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहेत. त्यामुळे 22 जुलै 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी निर्गमित केले आहे.
गडचिरोली जिल्यातील गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर परिस्थतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरीता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मिना यांनी गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये 22 जुलै 2023 रोजी सर्व अंगणवाडी, शाळा, विद्यालये व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
सदर आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.