गडचिरोली : गर्दैवाडा नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

5261

मा. पोलीस उपमहानिरिक्षक श्री. संदीप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १५ जानेवारी:- माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा, यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आज दिनांक १५/०१/२०२४ रोजी उपविभाग हेडरी अंतर्गत गर्दैवाडा या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका निर्भय व निकोप वातावरणात पार पडाव्यात तसेच या भागातील नागरिकांच्या सर्वागिण सुरक्षा व विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र गर्दैवाहा मैलाचा दगड ठरेल.

सदर पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ०४ पोकलेन, ४५ ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोस्ट उभारणी करण्यात आली. पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लैंट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ५५ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप ११, डी कंपणी नवी मुंबईचे ०२ प्लाटुन तसेच सीआरपीएफ १९१ बटा. डी कंपणीचे ०१ असिस्टंट कमांडन्ट व ७५ अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोमकें उभारणी कार्यक्रमादरम्यान गर्देवाडा येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सुट, नववारी साडी, पुरुषांना धोतर, युवकांना लोअर पॅन्ट टि-शर्ट, चप्पल, ब्लॅकेट, चादर, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतीदुर्गम भागात नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे तेथील नागरीकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाबद्दल सहानुभुती व्यक्त केली. तसेच या भागात गेली कित्येक दशके रस्ते, संपर्क साधने या पासुन वंचीत असलेल्या नागरिकांना १० टॉवर तसेच गट्टा, तोडगट्टा, वांगेतुरी रोड या कामाला तात्काळ सुरुवात करुन ते काम पुर्णत्वास नेण्याचा विश्वास यावेळी पोलीसांनी दिल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हावभाव झळकत होते.

सदर नवीन पोलीस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमास गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील सा., केंद्रीय राखीव बल, गडचिरोलीचे मा. पोलीस उपमहानिरिक्षक जगदीश मीणा सा., गडचिरोली जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, हेडरी बापुराव दडस व पोलीस मदत केंद्र गर्दैवाडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. बाळासाहेब जाधव, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

ग्रामस्थांनी माओवाद्यांच्या खोट्या कथनाने प्रभावित होवून त्यांच्या भरकटलेल्या क्रांतीला बळी पडू नये याकरीता नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाचे सर्वागीण विकासामध्ये महत्वाची भूमीका बजावेल…                                    मा. पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. संदीप पाटील सा.

 

आगामी सार्वत्रिक निवडणूका व या भागातील नागरिकांच्या सर्वागिन सुरक्षा व सेवेसाठी पोलीस मदत केंद्र गर्दैवाडा कटीबद्ध असेल…                         मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा.