गडचिरोली जिल्ह्यात १४४ कलम लागू
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २२ फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दिनांक २१ फरवरी २०२४ ते दिनांक १९ मार्च २०२४ तसेच माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा दिनांक २० मार्च २०२४ ते दिनांक २३ मार्च २०२४ व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दिनांक ०१ मार्च २०२४ ते दिनांक २६ मार्च २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, संजय मीणा, यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या २०० मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स, व एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता, येणार नाही.
परिक्षा केंद्रापासून २०० मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पारडण्यासाठी बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणा-याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांकास रात्री १२.०१ ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.