-प्रशासन अनिभिज्ञ, यापूर्वीही अवैध रेतीचे उत्खनन
लोकवृत्त न्यूज सावली, दि. १२ : तालुक्यातील सामदा घाटानजीकच्या डोंगरीपरिसरात असलेल्या अवैधरितीसाठ्यावर महिला तहसिलदार यांनी धाड टाकून जप्त केल्याची कारवाई पाच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. यात ६० ब्रास अवैध रेती साठा जप्त करण्यात आला. मात्र सदर रेती साठा कुणाचा ? असा प्रश्न उपस्थित होत असुन त्या रेतीसाठयाबाबत प्रशासनही अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केवळ रेती साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली मात्र सदर रेती साठा कुणाचा हे मात्र प्रशासनाला कळले नसल्याने ‘तो’ अवैध रेतीसाठा ‘त्याचा’ तर नाही ? अशा चर्चाही परिसरासह तालुक्यात रंगू लागल्या आहेत.
सध्याच्या घडीला तालुक्यात रेती घाटांचे लिलाव झालेले नाहीत. दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवैध रेती तस्कराने मतमोजणीच्या कामात महसुल अधिकारी गुंतले असल्याने हाच डाव साधून रेतीचे उत्खनन केले. मात्र मतमोजणी नंतर महसुल विभाागाचे अधिकारी यांना सदर अवैध रेती साठयाबाबत माहिती मिळताच त्यावर कारवाई करत रेती जप्त करण्यात आली. दरम्यान या घाटावरून यापूर्वी रेती घाट लिलाव झाला असतांना लिलाव झालेल्या रेती घाटाच्या बाजुला अवैध उत्खनन करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. सदर सामदा रेती घाटावर तालुक्यातील एका व्यक्तीचे वर्चस्व असल्याचे कळते तर राज्यातील मोठया नेत्याशी त्याचे हितसंबध असल्याचेही बोलल्या जात आहे. सदर रेती घाटावर त्याचे वर्चस्व असल्याने त्यानेच अजून अवैधरित्या रेती उत्खनन करून ठेवली असावी असा तर्क परिसरातील नागरिकांकडून लावण्यात येत असुन याबाबत मात्र प्रशासनालाकुठलीही माहिती नाही. कारवाई नंतर तो सुद्धा रेती आपलीच आहे असे म्हणायला धजावत असावा, आपली रेती म्हणून अधिक गुत्यांत कोण पडणार या भितीतुन तो समोर आला नसावा असाही अंदाज बांधण्यात येत आहे. कारवाई नंतर मात्र तालुक्यात व परिसरात विविध चर्चाना उधाण येत आहे .
दरम्यान सदर कारवाईने अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असुन सामदा घाटावरून अवैध रेती तस्करी जोमात सुरू असतांना मात्र आता महसुल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे हे विशेष.