लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : रेल्वे मार्गाच्या भराव्याकरिता अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्हा भरारी पथकाच्या सनियंत्रणात मागील तीन दिवसापासून मोठ्या क्षेत्राची तांत्रिक मोजणीची कार्यवाही सुरू होती. आज ती पूर्ण झाली असून संबंधित जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस तब्बल २ लाख ७३ हजार ३५१ ब्रास अवैध उत्खननाकरिता २३५ कोटी ८ लाख १८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम का आकारणी करू नये, याबाबत नोटिस बजावण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी गठीत केलेल्या विशेष जिल्हा भरारी पथकाचे प्रमुख तहसीलदार संजय पवार यांच्या निगराणीखाली ही कारवाई केली गेली. तहसिलदार हेमंत मोहरे यांनी दंड आकारणीच्या नोटीसा बजावल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय भांडारकर, कनिष्ठ अभियंता इंदुरकर, शाखा अभियंता अभिजीत शिनगारे, भूमी अभिलेखचे अभिलेखापाल व्हि. एल. सांगळे व त्यांच्या चमूने अवैध उत्खननाची तांत्रिक मोजणी करून तहसीलदार गडचिरोली यांच्याकडे अहवाल सादर केला त्यानुसार पाचपट दंड आकारणी करण्यात आली आहे.