दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

0
221

एकुण १६ लाख रूपयाचे शासनाने जाहिर केले होते बक्षिस

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 11 जुलै:- शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६८ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक ११ जुलै २०२४ रोजी दोन जहाल महिला माओवादी १) प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, वय ३६ वर्ष, रा. बोगाटोला (गजामेंढी), ता. धानोरा, जि. गडचिरोली व २) अखिला संकेर पुडो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य, सप्लाय टिम/स्टाफ टिम, वय ३४ वर्षे, रा. मरकेगाव ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस :- महाराष्ट्र शासनाने प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजूबाई हिचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

अखिला संकेर पुढो ऊर्फ रत्नमाला ऊर्फ आरती हिचेवर ०८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस :- आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन प्रमिला सुखराम बोगा व अखिला संकेर पुडो या दोन्ही महिला ना एकुण १० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २१ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट ११३ बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here