पशुपालकांनी अचुक माहिती द्यावी – पशुसंवर्धन उपआयुक्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१९ ऑगस्ट :- २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस येत्या १ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षानी पशुगणना केली जाते. या मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडुन धोरण, योजना आखल्या जातात व त्यानुसार निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधाचा पुरवठा केला जातो. गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासहित महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी आपल्याकडील जनावराची खरी माहिती प्रगणकांना देण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.