गडचिरोली – आरमोरी मार्गावर मोठमोठे भगदाड ; मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने

0
518

त्रस्त नागरिकांची मंत्री महोदयांना हाक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्हा हा विकासाच्या दृष्टीने देशात नंबर एक वर नेण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील मंत्र्यांमार्फत विविध कार्यक्रमातून सांगितल्या जाते मात्र सध्याची परिस्थिती बघता उलट दृष्य जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. गडचिरोली नागपूर महामार्गावरील गडचिरोली ते आरमोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडलेले असून नागरिकांना या मार्गाने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी ‘ मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने ‘ अशी हाकचं दिली आहे.
गडचिरोली ते नागपूर मोठ्या प्रमाणात वाहने धावत असतात. अशातच गडचिरोली – आरमोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडल्याचे चित्र आहे मात्र याकडे सबंधित विभाग ढुंकुनही पाहत नसल्याचे दिसते आहे. गडचिरोली ते आरमोरी मार्गावरील गडचिरोली शहराच्या बाहेर खरपुंडी नाका नजीक, मोहझरी, वसा पासून कोलांडी नाला व पुढील भागात तब्बल ५०० ते ८०० मीटर अंतर परिसरात भले मोठे भगदाड पहावयास मिळतात तर देऊळगाव या गावातून मुख्य मार्गावरही मोठे भगदाड दिसून येत आहे. देऊळगाव समोरील खोब्रागडी नदी, कोलांडी नालावरील पुलावराही खड्डे असून अपघाताची शक्य निर्माण झाली आहे. या मोठ्या भगदाडाने वाहन धारकांना जीव मुठीत घेऊन या मार्गाने प्रवास करावा लागत आहे तर खड्डे चुकवता चुकवता नाकीनऊही येत आहे.

मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने’

गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यापलेला आहे. जिल्ह्यातील लोहाखणीचे साठे बघता राजकारण्यांच्या नजरा जिल्ह्याकडे वळल्या आहेत. अशातच अनेक मंत्र्यांचे दौरेही जिल्ह्यात झाले असतांना विकासाच्या बाता मारताना दिसत आहे. मात्र केवळ विकासाचा बोभाटा करून होणार नाही तर प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र जिल्ह्यात अनुभवयास मिळत आहे. जिल्ह्यातील दळणवळनाकरीता असलेल्या रस्त्यांची दुर्दशा बघता जिल्ह्यातील नागरिक संतापले आहे. गडचिरोली – आरमोरी मार्ग असो की जिल्ह्याच्या दक्षिण भागातील प्रमुख व अतिदुर्गम भागातील तसेच जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा बघून विकासाचा बोभाटा हा केवळ नावापुरताच असल्याचे दिसून येते. नागपूर मार्गे जिल्हा मुख्यालयी येण्याकरीता नागपूर – उमरेड – नगभिड – ब्रम्हपुरी – आरमोरी – गडचिरोली असा प्रवास करावा लागतो. दरम्यान नागपूर ते आरमोरी पर्यंतचा प्रवास सुखाचा आहे मात्र आरमोरी ते गडचिरोली मार्गावर विविध ठिकाणी पडलेले मोठ मोठे भगदाड बघता शरीराच्या हड्डीचे त्रास नक्की निर्माण होणार आहे. मंत्र्यांना जिल्हा मुख्यालयी यायचे असल्यास याच मार्गाने यावे लागते मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात मंत्र्यांची रेलचेल सुरू असली तरी हवाई मार्गाने ते येत असल्याने नागरिकांनी त्यांना
‘मंत्री महोदय केव्हा येणार तुम्ही या रस्त्याने’ अशी हाक दिली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचे पालकमंत्री असो किंवा राज्यातील इतर मंत्री या रस्त्याने प्रवास करून नागरिकांना भेडसावणारा त्रास समजून घेणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

तर पुलावरून बस पलटी होता होता….

आरमोरी ते गडचिरोली मार्गावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक प्रवासी वाहनांना खड्डे चुकवीत प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी आरमोरी वरून गडचिरोली येथे रात्रीच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाची बस कशी बशी खड्डे चुकवीत येत असताना वसा नजीकच्या कोलांडी नाल्यावर जवळ येताच पुलावर व पुलाच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमुळे पलटी होता बचावली…बसमध्ये जेमतेम ७ ते १० प्रवासी होते मात्र सदर खड्ड्यांमुळे मोठा अपघात झाला असता. याबाबतची माहिती त्यादरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवासीने दिली आहे.

शालेय विद्यार्थ्यांनाही फटका

शालेय विद्यार्थी बस ने प्रवास करीत असतात. अशातच मार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांनाही खड्यांचां नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांनीही केली आहे.

वाहने होत आहेत भंगार

मोठमोठ्या खड्यांमुळे कमी उंचीच्या वाहनांनाही फटका सहन करावा लागत असून अनेक वाहने जमिनीला लागत असल्याचे कळते तर इतर वाहनांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहने या मार्गाने भंगार होत आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews  #pwd)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here