– अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागातील ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध
लोकवृत्त न्यूज
मुंबई, दि. २३ : अन्न व औषध विभागामार्फत ५६ पदांची भरती प्रक्रिया (टिसीएस) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून कोणीही दलाल व मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.
अन्न विश्लेषण प्रयोगशाळा विभागामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (गट क) ३७ पदे व विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब (अराजपत्रित) १९ पदे अशी एकूण ५६ पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज सदर करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ आहे. या पदाभरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या माध्यामतून राबविण्यात येणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन त्याचा निकाल विभागास सादर केल्यानंतर पुढील कागदपत्रे तपासणी व आदेश देणे हे काम विभागामार्फत केले जाणार असल्याचे मंत्री आत्राम यांनी सांगितले.
या भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेच स्वरुप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया बाबतची सविस्तर माहिती www.fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘सर्वसाधारण सूचना” या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना इत्यादी माहितीही वरील संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार असून याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, असे पदभरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे