काँग्रेस पक्षाने मला विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची संधी द्यावी : उषा धुर्वे

0
242

– पत्रकार परिषदेतून व्यक्त केली अपेक्षा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२५ : उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उद्योगाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले. ‘मेक इन गडचिरोली’च्या नावे दिशाभूल आणि बेरोजगारांची थट्टा झाली. ग्रामीण भागातच नाही तर गडचिरोली शहरातही विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. उघड्या नाल्या, भूमीगत गटार लाईनच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गडप करण्यात आले. हे सर्व प्रश्न सोडविण्यासोबत विकासाची नवी दिशा दाखविण्यासाठी माझ्या जन्मभूमीला मी आता कर्मभूमी करणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने मला विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा महिला काँग्रेस आदिवासी सेलच्या प्रदेशाध्यक्ष उषा धुर्वे यांनी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
गडचिरोली ही जन्मभूमी असलेल्या उषा धुर्वे गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी जुळलेल्या आहेत. नागपूर शहरात त्यांचे काम अविरतपणे सुरू आहे. एसटी महामंडळाच्या अधिकारी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शिवणकामाच्या माध्यमातून त्यांनी 400 पेक्षा जास्त गरजवंत महिलांना रोजगार देऊन त्यांची घरे सावरली. याच पद्धतीने गडचिरोलीतही महिला, युवा वर्गाला वनावर आधारित उद्योगातून मोठा रोजगार दिला जाऊ शकतो, असे उषाताईला वाटते. तेंदूपाने, बांबूवर आधारित गृहउद्योगातून प्रत्येक गरजवंत कुटुंबातील हातांना घरबसल्या काम मिळून चार पैसे कमवता येतात. पण लोकप्रतिनिधींना व्हिजनच नसल्यामुळे येथील कच्चा माल बाहेर जातो. त्याकडे आतापर्यंत कोणीच लक्ष दिले नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. मला संधी मिळाल्यास मी हे करून दाखविणार, असेही उषा धुर्वे म्हणाल्या.
भोळ्याभाबड्या आदिवासी नागरिकांची थट्टा थांबविण्यासाठी आणि विकासाची झलक त्यांना दाखविण्यासाठी मला गडचिरोली विधानसभेतून पक्षाने संधी द्यावी, मी गडचिरोली शहराचा आणि मतदार संघाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उषा धुर्वे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here