रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत चर्चा सुरु

0
69

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय समितीची गडचिरोली येथे बैठक संपन्न

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०४ :- गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महा विकास आघाडी सोबत सकारात्मक रीतीने चर्चा सुरु असून जागा वाटपाबाबत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास अन्य पर्यायासाठी मार्ग मोकळे ठेवण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने घेतला आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कमिटीची बैठक येथील विश्राम गृहातपक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत विधान सभा निवडणुकी सोबतच पक्ष संगठन व जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली .
सार्वजनिक उद्योगांचे खाजकीकरण करण्यात येऊ नये, खाजगी उद्योगांमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे, शिक्षणाचे व आरोग्य सेवांचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे आणि लोकांना दर्जेदार सेवा पुरविण्यात याव्या, सरकारी शाळा खाजगी संस्थांना देण्यात येऊ नये, निवृत्त शिक्षकांना कंत्राटी शिक्षक म्हणून भरती करण्याचा निर्णय रद्द करावा व बेरोजगार युवकांना शिक्षक पदी नेमण्यात यावे, गडचिरोली जिल्ह्यातील खनिज व वन संपत्तीची लूट थांबविण्यात यावी, जिल्ह्यातील खराब झालेले रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तात्काळ लाभाच्या योजनांद्वारे मतांसाठी जनतेला आकर्षित करण्याऐवजी लोकांना रोजगार व अर्थ सहाय्य्य उपलब्ध करून देण्यात यावे इत्यादीप्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली व सरकारने या मागण्यांची त्वरित पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस घनश्याम फुसे, उपाध्यक्ष रोहिदास राऊत अशोक निमगडे कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर, केंद्रीय सदस्य प्रा. सुरेश पानतावणे, विशालचंद्र अलोणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकी नंतर गडचिरोली जिल्यातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला व पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर,महिला आघाडीच्या सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवार, विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, दादाजी धाकडे, विजय देवतळे, अरुण भैसारे, कल्पना रामटेके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो –बाळासाहेब खोब्रागडे बैठकीला मार्गदर्शन करीत असून रोहिदास राऊत घनश्याम फुसे, अशोक निमगडे व अन्य पदाधिकारी बसले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here