प्रधान जिल्हा न्यायाधीशाच्या एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर असलेल्या हवालदाराचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू

0
655

– जिल्हा न्यायालय परिसरातील घटना

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.११ : प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराचा बंदुक हाताळत असताना अचानक गोळी सुटून लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज ११ डिसेंबर रोजी दुपारी २.५५ वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्हा न्यायालय परिसरात घडली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली होती. उमाजी होळी रा. मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली असे पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलीस हवालदार होळी हे गडचिरोली जिल्हा पोलीस दलात असून आज ११ डिसेंबर रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता कर्तव्यावर हजर होते. दरम्यान दुपारी ०२.५५ वाजताच्या सुमारास होळी हे जिल्हा न्यायालय गडचिरोलीचे आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत हत्यार हाताळत असताना हत्यारातून गोळी झाडली जाऊन ८ पैकी ३ गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली असून मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या १२ डिसेंबर २०२४ रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे. सदर घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here