गडचिरोली जिल्ह्यात ‘बाल स्नेही पंचायत’ स्थापन ; विविध मंत्रिपदांची निवड

0
98

गडचिरोली जिल्ह्यात ‘बाल स्नेही पंचायत’ स्थापन ; विविध मंत्रिपदांची निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१५: जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा ग्रामपंचायतीमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बाल स्नेही पंचायत’ स्थापन करण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ११ ते १८ वयाच्या ४३ मुलांनी सहभाग घेतला. ‘बाल स्नेही पंचायत’मध्ये ७ मुख्यमंत्रिपद, ७ उपमुख्यमंत्रिपदांसह विविध मंत्रिपदांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये शिक्षण मंत्री, उपशिक्षण मंत्री, बाल सुरक्षा मंत्री, उपसुरक्षा मंत्री, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, अन्न व पोषण मंत्री, नियोजन मंत्री, माहिती व प्रचार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्रिपदांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत भेंडाळा आणि ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’ यांच्या पुढाकाराने ‘बाल स्नेही पंचायत’ स्थापन करण्यात आली आहे, ज्यामुळे मुलांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली जात आहे. या कार्यक्रमात ग्रामपंचायत भेंडाळा सरपंच सौ. कुंदा जुवारे आणि ‘मॅजिक बस’च्या तालुका समन्वयक योगिता सातपुते यांनी मुलांना ‘बाल स्नेही पंचायत’चे महत्त्व सांगितले. सर्व कार्यक्रमाची यशस्वी रचना युवामार्गदर्शक हर्षाली खारकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली.
यावेळी सरपंच कुंदा जुवारे, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, आशावर्कर ताई, युवा मार्गदर्शक हर्षाली खारकर, पल्लवी झरकर तसेच इतर उपस्थित होते. लवकरच बाल स्नेही पंचाय सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि मॅजिक बस त्यांच्यासोबत चर्चा सत्र घेणार आहेत. वरील सर्व सभा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here