रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक चांदेकर भवन येथे नुकतीच पार पडली.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधान सभा अध्यक्ष प्रदीप भैसारे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे , जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे हे प्रामुख्याने हजर होते.
या बैठकीत पक्ष संघटना व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली व संगठन बांधणीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. आगामी निवडणुका पक्षातर्फे लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने संबंधीत क्षेत्रात जनसंपर्क वाढवून संगठन अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
लवकरच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. रिपब्लिकन पक्ष हा दलित आदिवासी व गोरगरीब लोकांसाठी लढणारा पक्ष असल्याने जास्तीती जास्त लोकांना पक्षात सहभागी करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रिपब्लिकन पक्ष आज गटातटात विखुरलेला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आंदोलनाची व विचारधारेची खरी ओळख हाच पक्ष आहे आणि म्हणून तीच आंबेडकरी लोकांची पहिली पसंती असल्याचे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी यावेळी बोलताना केले व हा पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
बैठकीला कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, तालुका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, पुण्यवान सोरते, सिद्धार्थ खोब्रागडे, विजय देवतळे महिला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे, चंद्रभान राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.