मनीषनगर आरयूबीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन
लोकवृत्त न्यूज
नागपूर, दि. २८ :- मनीष नगरचा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सतावतो आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या काळात एका फ्लायओव्हरची निर्मिती या भागात करण्यात आली. मात्र त्यातून वाहतुकीची समस्या फारशी सुटली नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ही दुसरी कनेक्टिव्हिटी आपण या भागात सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शहरातील सोमलवाडा (मनीषनगर) भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका करणा- या रेल्वे अंडर ब्रिजचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाच्या लोकार्पणप्रसंगी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ .कृपाल तुमाने, व्यवस्थापकीय संचालक- महा मेट्रो श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिशय आव्हानात्मक प्रकारचे हे काम होते. महा मेट्रोसह सर्वांनी चांगले काम केले आहे त्यातून ही कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे. लवकरच मनीष नगरला जोडणारी तिसरी कनेक्टिव्हिटी ही आपण या भागात तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. आपण एक अंडरपास तयार केला होता. पण त्यातून समस्या सुटली नाही. म्हणून दुसऱ्या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. नवीन अंडरपाससाठी जागेची निवड करण्यात आली आणि महामेट्रोकडे कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे. या भागात रेल्वेचे फाटक होते. पण १७० रेल्वे धावत असल्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. आता नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे, असे केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.
सोमलवाडा (मनीषनगर) येथील रेल्वे अंडर ब्रिजविषयी…
सोमलवाडा (मनीष नगर) आरयूबी प्रकल्पाचा एकूण खर्च ३३.८३ कोटी रुपये असून, आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. आरयूबीचे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे. आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी होईल. याचा मोठा फायदा मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील लाखो नागरिकांना होईल. रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल. तसेच मनीषनगर येथील रहिवाश्यांना वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवता येईल. क्रॉसिंगवर होणारा जामचा त्रास दूर होईल आणि त्यासोबतच प्रवासात वेळेचीही बचत होईल.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur)