– प्रेम, संघर्ष आणि अधिकाराच्या दशकाचा उत्सव
लोकवृत्त न्यूज
पुणे, 14 फेब्रुवारी – अनहद सोशल फाऊंडेशन प्रस्तुत आणि राईट टू लव्ह आयोजित भव्य ‘प्रेमोत्सव’ जोरदार साजरा झाला. प्रेमाला कोणत्याही चौकटीत न अडकवता, ते मुक्त आणि निर्भय असावे हा संदेश देत पुण्यातील बालगंधर्व पोलीस चौकी, जे. एम. रोड येथे या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या प्रेमोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे राईट टू लव्ह चळवळीला दहा वर्षे पूर्ण झाल्याचा महत्वपूर्ण टप्पा! या दशकभराच्या प्रवासाला साजरा करत ‘एका दशकाचा प्रवास… प्रेम, संघर्ष आणि अधिकाराचा’ ही टॅगलाइन या उत्सवासाठी वापरण्यात आली.
प्रेमाची भाषा – 16 भारतीय भाषांमधून संदेश
या वर्षीच्या प्रेमोत्सवाची संकल्पना होती – “प्रेमाला भाषा नसते”. या संदेशाला मूर्त स्वरूप देत हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, बंगाली, उर्दू, गुजराती, पंजाबी, ओडिया, कन्नड, मल्याळम, असमिया, संस्कृत, कश्मिरी, संथाली आणि मैथिली अशा 16 प्रमुख भारतीय भाषांमध्ये ‘प्रेम’ हा शब्द असलेल्या आकर्षक पोस्टर्स लावण्यात आले होते.
रंग, सुगंध, संगीत आणि रोमँटिक वाऱ्यांनी भारलेला माहोल
उत्सवस्थळी रोमँटिक आणि उत्साही वातावरण निर्माण करण्यासाठी बदामाच्या आकारातील लाल फुगे, शहनाई वर वाजवली जाणारी 90 च्या दशकातली प्रेम गीते, चॉकलेट्स, गुलाब फ्लेवर अत्तर-धूप आणि खास बदामाच्या आकाराचा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या सेल्फी पॉईंटवर राहुल सिद्धार्थ साळवे यांच्या प्रसिद्ध ओळी –
“केवळ सोबतीची नाही, प्रेम गोष्ट असते सावलीची” आकर्षकपणे वापरण्यात आल्या होत्या. ज्यामुळे अनेक प्रेमी जोडपी फोटोसाठी आकर्षित झाले.
प्रेमोत्सवात मान्यवरांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या अनोख्या उत्सवाला राईट टू लव्ह आणि अनहद सोशल फाऊंडेशनचे संचालक के. अभिजीत, स्टेक मीडियाचे श्रीजित रसाळ, सुचिता सावंत, चित्रपट आर्ट दिग्दर्शक संतोष संखद, सोनाली मॅम, तिलोक भालेराव, अक्षय धावडीकर, अमरजा शिंदे, वैभव, कवी मिलिंद दामोदरे, सागर काकडे, जितेन सोनावणे यांसारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्रेमाला निर्भयतेची साथ
दरवर्षीप्रमाणे राईट टू लव्ह च्या वतीने प्रेमाला निर्भयतेची आणि समानतेची साथ मिळावी, हा संदेश देण्यासाठी या प्रेमोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रेम ही केवळ भावना नसून तो एक हक्क आहे, याच जाणीवेतून राईट टू लव्हच्या कार्यकर्त्यांनी हे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू ठेवले आहे.
प्रेम हे बंधनमुक्त असावे, ते निर्भय असावे आणि प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे प्रेम करण्याचा अधिकार उपभोगावा – हाच संदेश घेऊन प्रेमोत्सव 2025 ने एक अविस्मरणीय ठसा उमटवला!