वाहन चोरीतील आरोपी जेरबंद, ९ दुचाकी जप्त

241

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 28 : गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये विविध ठिकाणी वाहन चोरीच्या गुन्ह्यांत वांटेड असलेल्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या एकूण ९ दुचाकी वाहनांचा शोध घेऊन पोलिसांनी अंदाजे ३,१५,०००/- रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार पोस्टे कोटगुल येथे २४ मार्च २०२५ रोजी कलम ३०३(२) भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा (अप. क्र. ०२/२०२५) नोंदवण्यात आला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने २५ मार्च रोजी पो. स्टे. कोटगुलचे पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि.) दयानंद शिंदे यांनी मुख्य आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे याची ओळख पटवली.
गोपनीय माहितीच्या आधारे मौजा टेमली (छ.ग.) येथून आरोपी प्रदीप कुमार फुलसिंग कोडापे (वय १९, रा. टेमली, ता. मोहल्ला, जि. मानपूर-मोहल्ला, छ.ग.) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन केलेल्या तपासात त्याने साथीदार टेमनलाल रामखिलावन साहू (वय १९, रा. चिलमगोटा, ता. दौंडी लोहारा, जि. बालोद, छ.ग.) याच्यासह वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
२५ मार्च रोजी दोन्ही आरोपींना अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीत गडचिरोलीतील पोस्टे कोरची (अप. क्र. ०२९/२०२५), छत्तीसगडमधील बसंतपूर (अप. क्र. ००९७/२०२५) येथेही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले.
या तपासात पोलिसांनी एकूण ९ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या, ज्यांची अंदाजे किंमत ३,१५,०००/- रुपये आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोस्टे कोटगुलचे पोउपनि. कृष्णा सोळंके यांच्या नेतृत्वाखालील टीमने—पोउपनि. दयानंद शिंदे, पोहवा भजनराव कोडाप, श्यामलाल नैताम, पोअं विनय सिध्दगु, किशोर बावणे, अनिल मडावी—ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
पोलीस तपास कौशल्याच्या जोरावर गडचिरोली आणि छत्तीसगडमधील वाहन चोरीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. पोलिसांनी भविष्यात अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #gadachiroli police @gadachirolipolice)