गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई: 61.77 लाखांची अवैध दारू नष्ट

62

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 28 मार्च – गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक व विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात आली. पोस्टे देसाईगंज येथे 2018 ते 2024 या कालावधीत जप्त करण्यात आलेला 61.77 लाख रुपयांचा अवैध दारू साठा अधिकृत परवानगीने नष्ट करण्यात आला.

पोलीस विभागाच्या ताब्यात मोठ्या प्रमाणावर जप्त मुद्देमाल असल्याने जागेच्या अभावामुळे त्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मा. न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांच्या मंजुरीने हा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

सदर कारवाईत देशी व विदेशी दारूच्या हजारो बाटल्या, बिअरचे कॅन आणि अन्य मद्यसाठा होता. हा संपूर्ण साठा रोड रोलर आणि जेसीबीच्या सहाय्याने चिरडून नष्ट करण्यात आला. त्यानंतर खड्डा खोदून त्यातील अवशेष पुरण्यात आले, यावेळी पर्यावरणाची हानी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी (कुरखेडा) रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.    पोस्टे देसाईगंज प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप, सपोनि. प्रेमकुमार दांडेकर, श्रेणीपोउपनि. दुर्योधन सरपे, तसेच पोलीस अंमलदार शैलेश तोरकपवार, पुंडलीक मानकर, सतीश बैलमारे यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांना मोठा धक्का बसला असून, भविष्यातही अशा कारवायांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #gadachiroli police @gadachirolipolice)