गडचिरोली काँग्रेसची आक्रमक भूमिका ; ५ पासून नदीपात्रात करणार ठिय्या आंदोलन

99

– मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा दिला होता इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ एप्रिल रोजी वैनगंगा नदीपात्रात तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गोसीखुर्द धरणातील अडवलेले पाणी सोडण्याच्या मागणीसह अन्य महत्त्वाच्या विषयांवरही काँग्रेसने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज ३१ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही भूमिका काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आमदार रामदास मसराम यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्यामुळे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. यामुळे उन्हाळी पिके करणे कठीण झाले असून, पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसह जनावरांवरही पाण्याच्या अभावाचा परिणाम होत आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन चंद्रपूर रोडवरील वैनगंगा नदीपात्रात पुलाखाली करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या पाणी समस्या, शेतीपूरक निर्णय आणि शासनाच्या विविध धोरणांविरोधात हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. कविता मोहरकर, तसेच विविध तालुकाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीतील जनतेच्या पाणी प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. आता शासन या मागण्यांची दखल घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.