गडचिरोलीत भाजपाच्या नगरसेवक दांपत्याकडून महिलांची फसवणूक ; आत्मदहनाचा दिला इशारा

435

– कठोर कारवाईची केली मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ : जिल्ह्यातील भाजपच्या नगरसेवक दांपत्याकडून जवळपास ४० महिलांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आज आयोजित पत्रकार परिषदेतून महिलांनी केल्याने जिल्ह्यात तसेच भाजप गोटात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील चामोर्शी नगरपंचायतचे भाजपचे नगरसेवक आशिष पिपरे आणि नगरसेविका सोनाली पिपरे यांनी आपली मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आज ३१ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून करीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसे न झाल्यास आत्मदहनाचा इशारा फसवणूक झालेल्या पीडित महिलांनी दिला आहे.
चामोर्शी येथील जवळपास ४० गरीब महिला आणि शासनाच्या योजनेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो महिलांना लाखोंच्या कर्जाच्या सापळ्यात अडकवण्यात आल्याचा आरोप यावेळी केला आहे.
पत्रकार परिषदेत पीडित महिलांनी सांगितले की, सन 2020 मध्ये दिवाळीच्या सुमारास भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसाठी अगरबत्ती प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली. रोजंदारी व नफा कमावता येईल, अशा गोड शब्दांत महिलांना फसवण्यात आले. आशिष पिपरे आणि सोनाली पिपरे यांनी महिलांकडून अर्ज भरवून घेतले, मात्र कोणत्या योजनेत अर्ज गेले याची माहिती दिली नाही. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चामोशी येथे महिलांना बोलावून इंग्रजीत असलेल्या कर्ज मंजुरीच्या फॉर्मवर सह्या घेतल्या. प्रत्येकी दोन लाखांचे कर्ज मंजूर करुन घेतले आणि 5% रक्कम महिलांकडून वसूल केली. मात्र, 35,400 किंमतीची मशीन दाखवून एका मशीनसाठी तब्बल 1 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेकडून कर्ज मंजूर होऊनही 90 मशीन लाभार्थींना देण्यात आल्या नाहीत. त्या मशीन कोठे आहेत, त्यांची विक्री करण्यात आली का, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. परिणामी, महिलांना बँकेकडून व्याजासह 2.50 लाख रुपये परतफेड करण्याच्या नोटिसा आल्या.
PMEGP अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानावरही डोळा ठेवून शासनाचीही मोठी फसवणूक करण्यात आली. 35,400 किंमतीची मशीन 1 लाख दाखवून 30% अनुदान लाटण्याचा डाव आखण्यात आला. महिलांनी मशीन मिळाली नसल्याचे सांगूनही त्यांच्या नावावर बोगस कर्जाचा बोजा टाकण्यात आला.
दरम्यान फसवणुकीची तक्रार देण्यासाठी महिलांनी पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, एसपी ऑफिस, बँकेचे मुख्यालय गाठले. मात्र, कोणत्याही ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही. विरोध केल्यास भाजपच्या मोठ्या नेत्यांचे नाव सांगत धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोपही महिलांनी यावेळी केला आहे.
या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. अन्यथा, भाजपा कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. लाडक्या बहिणींना शासन प्रशासन न्याय मिळवून देणार काय याकडे लक्ष लागले असून या गंभीर प्रकरणात जिल्ह्याचे पालकमंत्री, सहपालकमंत्री गांभीर्याने लक्ष देऊन काय भूमिका घेणार याकडेही जिल्हा वासियांच्या नजरा फिरकल्या आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice #BJP )