गडचिरोलीत दारू तस्कराचा हैदोस : जंगलात नेऊन तरुणाला पिस्तुल लावून बेदम मारहाण

57

– रोज १०-१२ गुंड घेऊन घरी येतो, जीवावर बेतली स्थिती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छल्लेवाडा येथील कुख्यात दारू तस्कर गुलाब देवगडे याने आपला सहकारी अमोल महेसकर यास मल्लमपल्लीच्या जंगलात नेऊन पिस्तुल डोक्यावर लावून बेदम मारहाण केल्याचा थरारक प्रकार समोर आला आहे. केवळ दारू व्यवहारातून उर्वरित रक्कम मिळाली नाही म्हणून संबंधित तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे.
आरोप आहे की, गुलाब देवगडे याने अमोल महेसकर याला सुरुवातीला रोजगाराचे आमिष दाखवून दारू तस्करीच्या धंद्यात ओढले. महेसकर याने सोनु माटे नामक दारू विक्रेत्याकडून २०० पेटी दारूचे ऑर्डर घेऊन दिले. मात्र दारूमध्ये पाणी मिसळल्याचा आरोप करत सोनु माटे यांनी उर्वरित पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या गुलाब देवगडे याने ६ एप्रिल रोजी अमोल याला मल्लमपल्लीच्या जंगलात नेऊन जबर मारहाण केली.
फक्त एवढ्यावरच न थांबता, आता गुलाब दररोज बोलेरो गाडीतून १०-१२ गुंडांना घेऊन महेसकर यांच्या आलापल्ली येथील घरी पोहोचतो व धारदार शस्त्र, पिस्तुल दाखवत जीवे मारण्याच्या धमक्या देतो आहे. त्यामुळे महेसकर यांचे संपूर्ण कुटुंब भयभीत असून, त्यांनी पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्याकडे संरक्षण मागणीसाठी अर्ज सादर केला आहे.
अमोल महेसकर यांची पत्नी व दोन मुलांसह अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. “माझा या व्यवहाराशी काहीही संबंध नसताना मला त्रास दिला जातोय, मी एक सामान्य मजूर आहे. माझं मानसिक संतुलन बिघडत आहे. माझं व कुटुंबाचं रक्षण करावं,” अशी हाक त्यांनी आपल्या अर्जात दिली आहे.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.