कमलापुर आश्रम शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रयत्न ; खंडणीसाठी शिक्षकांवर खोटे आरोप

51

कमलापुर आश्रम शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रयत्न ; खंडणीसाठी शिक्षकांवर खोटे आरोप

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- कमलापुर येथील श्रीगुरुदेव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळेतील दोन शिक्षकांनी खंडणीखोरांविरुद्ध पोलीस आणि प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, शिक्षकी पेशावर खोटे आरोप लावून १५ लाख रुपये मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
शाळेचे माध्यमिक शिक्षक श्याम पांडुरंग धाईत आणि प्राथमिक शिक्षक दिलीप भिवाजी राऊत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, २१ मार्च रोजी इयत्ता 8वीच्या वर्गात धाईत सर शिकवत असताना, एका विद्यार्थिनीला शिकवताना त्यांच्या पायाचा स्पर्श अनवधानाने झाला. त्यानंतर त्यांनी ती विद्यार्थिनी मागील बाकावर बसवली. ही संपूर्ण घटना पूर्णपणे अनावधानिक आणि शिक्षक म्हणून नेहमीच घडू शकणाऱ्या सहज बाबींतील होती.
मात्र, या घडलेल्या घटनेचा गैरफायदा घेत, संतोष रामचंद्र ताटीकोंडावार, रा. कमलापुर व श्रीनिवास गावडे, रा. उमानुर व इतर यांनी त्यांच्यावर खोटे आरोप लावत, पोक्सासारख्या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर बनावट व्हिडीओ तयार करून त्यावरील कथित पुराव्याच्या आधारे माध्यमांसमोर खोटी बदनामी करण्याची धमकीही दिली जात आहे. इतर विद्यार्थिनींनाही भडकावून खोटे आरोप लावण्याचा डाव रचण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकारामुळे शाळेच्या वातावरणावर परिणाम होत असून, शिक्षकांची मानहानी व मानसिक छळ सुरू आहे. याप्रकरणात जाणीवपूर्वक खोटा गुन्हा घडवून आणण्याचा प्रयत्न होत असून, शिक्षकांच्या जिवाला देखील धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत, शिक्षकांनी मागणी केली आहे की एक स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती नेमून, विद्यार्थ्यांची आणि शाळेतील कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी. तसेच खोटे आरोप करून खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून शिक्षणसंस्थेचे नाव वाचवले जाईल आणि सत्याला न्याय मिळेल.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra )