गडचिरोली : डॉक्टर-परिचारिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू ;

360

गडचिरोली : डॉक्टर-परिचारिकेच्या दुर्लक्षितपणामुळे आदिवासी गर्भवती महिलेचा मृत्यू ; शिवसेनेचे आंदोलन पेटल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- जिल्ह्यातील विसोरा (ता. देसाईगंज) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत डॉक्टर आणि परिचारिकेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील गर्भवती महिला मनिषा शत्रुघ्न धुर्वे (३१) हिचा व तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
१३ एप्रिल रोजी पहिलीच प्रसूती असलेल्या मनिषाला तिच्या कुटुंबीयांनी विसोरा येथील उपकेंद्रात दाखल केले होते. वेळेवर प्रसूती न झाल्याने तिला देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी “थोडा वेळ थांबा, इथेच प्रसूती होईल,” असे सांगत रुग्णवाहिका परत पाठवली. पण तब्बल १२ तास उलटूनही प्रसूती झाली नाही. अखेर तिला ग्रामीण रुग्णालयात व नंतर ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
या धक्कादायक घटनेनंतर देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन सुरू असताना शिवसेना नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात नागरिकांनी “दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह नेणार नाही” असा निर्धार करत आंदोलन छेडले. यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरु असल्याचे सांगितले. “डॉक्टर आणि परिचारिका दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या प्रकारातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पाहावे लागेल की प्रशासन या प्रकरणात दोषींवर खरंच कठोर कारवाई करते का, की हा प्रकारही अन्यायाच्या फाईलमध्ये दफन होतो.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Chandrapurnews  #crime)