गडचिरोलीत सी-६० जवानाच्या हत्येप्रकरणी चार जहाल माओवादी अटकेत

434

गडचिरोलीत सी-६० जवानाच्या हत्येप्रकरणी चार जहाल माओवादी अटकेत; ४० लाखांचे बक्षीस घोषित

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १९ एप्रिल :- जिल्ह्यात माओवादीविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत गडचिरोली पोलिसांनी आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत सी-६० जवानाच्या हत्येप्रकरणी चार जहाल माओवादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटकेतील चारही माओवाद्यांवर मिळून एकूण ४० लाख रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.

ही कारवाई ताडगाव पोलीस व सीआरपीएफच्या ९ बटालियनच्या एफ कंपनीने पल्ली जंगल परिसरात केली. दिरंगी-फुलनार येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या चकमकीत सी-६० जवान शहीद झाला होता. या चकमकीत अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे.

ही आहेत अटक करण्यात आलेले माओवादी

सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु (५५ वर्षे) – सचिव, दक्षिण गडचिरोली विभागीय समिती, रा. लिंगापूर, जि. निजामाबाद, तेलंगणा. (बक्षीस – २० लाख)

जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला (४१ वर्षे) – सचिव, भामरागड एरिया कमिटी, रा. कंचाला, जि. बीजापूर, छत्तीसगड. (बक्षीस – १६ लाख)

झाशी तलांडी ऊर्फ गंगु (३० वर्षे) – सदस्य, भामरागड दलम, रा. येचली, जि. गडचिरोली. (बक्षीस – २ लाख)

मनिला गावडे ऊर्फ सरिता (२१ वर्षे) – सदस्य, भामरागड दलम, रा. कापेवंचा, अहेरी, जि. गडचिरोली. (बक्षीस – २ लाख)

ही चारही माओवादी संशयित हालचाली करताना आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन प्राणहिता उपमुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली ओळख कबूल केली तसेच चकमकीतील सहभागाची पुष्टी केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी :

सायलू ऊर्फ रघु याच्यावर ७७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ३४ चकमक व २३ खून समाविष्ट आहेत. जैनी ऊर्फ अकिलावर २९ गुन्हे (१८ चकमक, ४ खून), गंगूवर १४ गुन्हे (१२ चकमक), तर सरितावर १० गुन्हे (५ खून) दाखल आहेत.

संबंधितांवर भारतीय दंड विधान, आर्म्स अ‍ॅक्ट, विस्फोटक पदार्थ अधिनियम व बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (UAPA) विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गडचिरोली पोलिसांनी २०२२ पासून आतापर्यंत ९६ माओवादी कार्यकर्त्यांना अटक केली असून, ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. त्यांनी माओवाद्यांना शस्त्र टाकून आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले असून, माओवादीविरोधी कारवाया आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #crime #naxal)