राज्यघटनेचे उल्लंघन, विकासाच्या नावाखाली आदिवासींचे शोषण : अॅड. डॉ. सुरेश माने
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- “आजचा जयघोष हा संविधानाचा केला जातो, पण प्रत्यक्षात संविधानाची हत्या करण्याचे षड्यंत्र सुरू आहे,” अशी तीव्र टीका बी.आर.एस.पी. संस्थापक अॅड. डॉ. सुरेश माने यांनी गडचिरोली येथे आयोजित संविधान अधिकार सम्मेलनात केली.
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अॅड. माने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गेल्या दहा वर्षांत सत्ताधाऱ्यांनी लोकशाही आणि राज्यघटनेच्या मूल्यांवर हल्ले चढवले आहेत. जाती-धर्माच्या नावावर देशात फूट पाडून, सरकारी योजनांच्या आडून गोरगरीबांना परावलंबी बनवले जात आहे. विकासाच्या नावाखाली मुठभर भांडवलदारांचे हित साधले जात असून, कोट्यवधी सुशिक्षित तरुण बेकार झाले आहेत.
डॉ. माने यांनी विदर्भातील शेतकरी, आदिवासी, बेरोजगारांचे प्रश्न उपस्थित करताना सरकारच्या “विकासाच्या” दाव्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, धानाचा बोनस, विज पुरवठा, सिंचन योजना या फक्त आश्वासने राहिल्या असून, प्रत्यक्षात आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बेदखल करून खासगी कंपन्यांना फायदा देण्यात येतो आहे. गडचिरोलीत पेसा कायद्याचे उल्लंघन होत असून, ग्रामसभांचा अधिकार सरकारने हक्काने हिसकावला आहे.
याच अन्यायाविरोधात दि. 7 मे 2025 रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बी.आर.एस.पी. व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. माने यांनी केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रिपब्लिकन नेते रोहीदास राऊत यांनी आंबेडकरी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तर आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत प्रा. अनिल होळी यांनी भाजप व काँग्रेसपासून सावध राहून आदिवासी समाजाने आंबेडकरवादाचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले.
संमेलनाचे आयोजन बी.आर.एस.पी. गडचिरोली जिल्हा तर्फे करण्यात आले होते.


