जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सूचना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, 30 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्ता सुरक्षा विषयाबाबत विविध सूचना देण्यात आल्या. जिल्हयात होणाऱ्या अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत एक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, एक मोटार वाहन निरिक्षक व एक सार्वजनिक बांधकाम विभागाचा उप अभियंता यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. सदर समितीने प्राणांतिक अथवा ज्या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेले आहेत असे अपघात झाल्यानंतर तात्काळ संबंधित स्थळास भेट देऊन झालेल्या अपघातास वाहन चालक, वाहनाची यांत्रिक स्थिती, रस्त्याची तांत्रिक व भौगोलिक परिस्थिती अथवा अपघात इतर कोणत्या कारणास्त्व झाला आहे यांचे विश्र्लेषण करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हा रस्ता सुरक्षा समितीस सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हयात दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, यासह सर्वच अपघातांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यास सूचना दिल्या.
राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या निर्णयाची जिल्हयात अंमलबजावणी करण्यात यावी. रुग्णवाहिकांची चांगली सुविधा सुनिश्रिचत करावी. ज्यामुळे प्रतिसाद देण्याच्या वेळेत आणि दवाखान्यात नेऊन सोडण्याच्या वेळेत सुधारणा होण्यास मदत होईल. जिल्हयात होणाऱ्या विविध प्रकारच्या अपघातांची संख्या विचारात घेऊन रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्यात. जिल्हयातील संपूर्ण रस्त्यांचे,सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेमार्फत सर्वेक्षण करुन घ्यावे व वाहतुक चिन्हे,अपघात टाळण्याऱ्या सूचना कुठे लावणे आवश्यक आहे अथवा असलेली वाहतुक चिन्हे,सूचना कुठे बदलणे आवश्यक आहे,हयाचा विस्तृत अहवाल तज्ञ सर्वेक्षण संस्थेमार्फत करुन घ्यावा अशा सुचना त्यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला अति. पोलीस अधिक्षक श्री चिंता, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अनिल रूडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी आरपी निकम, कार्यकारी अभियंता, सा.बा.विभाग, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, मुख्याधिकारी, नगर परिषद, विभाग नियंत्रक, बस आगार, जिल्हा माहिती अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा हे उपस्थित होते.