– नागरिकांत दहशत कायम, २५ दिवसांच्या अंतरात दुसरी शेळी फस्त
लोकवृत्त न्यूज
सावली, २६ जानेवारी : तब्बल २५ दिवसानंतर तो वाघ परत आला आणि शेळी ठार केल्याची घटना सावली तालुक्यातील केरोडा येथ २५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. जीवनदास सातपुते रा.केरोडा असे शेळी मालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सातपुते हे केरोडा- व्याहाड (बूज) मार्गावर असलेल्या स्वतःच्या शेत परिसरात शेळी चारण्याकरिता घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या दिशेने हल्ला चढवला मात्र सातपुते यांनी जवळच असलेल्या तनसीच्या ढिगावर धाव घेत आपले प्राण बचावले. दरम्यान सोबतच असलेल्या शेतीवर वाघाने झडप घेऊन फरफटत नेले. या घटनेदरम्यान जीवनदास सातपुते हे बालबाल बचावले मात्र त्यांची शेळी यात ठार झाली. घटनेची माहिती वनविभागाला माहीत होताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा केला. सदर घटनेने मात्र नागरिक दहशतीत असून वाघास जेरबंद करण्याची मागणी केली आहे. वनकर्मचाऱ्यांनी परिसरात वाघाला जेरबंद करण्याकरिता पिंजरे लावले असल्याची माहिती असून वाघ जेरबंद होणार काय याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.