लोकवृत्त न्यूज ( Lokvrutt news)
भामरागड, ८ जून : नगरपंचायत क्षेत्रातील आठ गावांमधील नागरिकांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने नगरपंचायत क्षेत्र ताडगाव येथे आरोग्य विभागातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले. या दवाखान्यातून शहरी नागरिकांची संपूर्ण मोफत तपासणी, मोफत उपचार व मोफत औषधी वितरण करण्यात येणार आहे.
येथे रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी यांनी दिली. माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. मिताली आत्राम, तहसीलदार तथा मुख्याधिकारी प्रकाश पुप्पालवार, संवर्ग विकास अधिकारी स्वप्निल मगदूम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण चौधरी, नगरपंचायतीच्या अध्यक्ष रामबाई महाका, उपाध्यक्ष विष्णू मडावी, नगरसेविका कविता येतामवार, माजी पंचायत समिती सभापती लालसू आत्राम, प्रभारी अधिकारी सयाम, आदिवासी सेवक मोगल, रमेश मारगोनवार, जगदीश कोंकमुट्टीवार, आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश तिरणकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कन्नाके, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवाढ आदी उपस्थित होते. या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक, शिपाई, हंगामी कर्मचारी अशी विविध पदे आहेत. यापैकी फक्त वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका हे पद भरण्यात आले आहेत. उर्वरित पदे लवकरच भरणे आवश्यक आहे. तालुक्यात आधीच मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा डोंगर आहे. याबाबत सतत पाठपुरावा करूनही ही रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे ही पदे कधी भरली जातील की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आपला दवाखान्यात प्रामुख्याने रात्री १० वाजेपर्यंत बाह्य रुग्ण विभाग चालविला जाणार आहे. भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळपासून बाह्यरुग्ण विभाग चालेल. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागाची सेवा नागरिकांना दिवसभर उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयामुळे ग्रामीण रुग्णालयावरील भार कमी होण्यास मदत होईल. तालुक्यात आरोग्य सेवा अतिशय कमजोर आहे. या दवाखान्यामुळे थोडी सुविधा मिळण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.