लोकवृत्त न्यूज
कोरची २६ जून : स्थानिक पोलिस स्टेशन येथे शेतकऱ्यांसाठी कृषी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी विद्या मांडलिक होत्या. मेळाव्याचे उद्घाटन कोरची पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आर. एम. फाये यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गेडाम, कृषी पर्यवेक्षक पंचभाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. पोलिस निरीक्षक अमोल फडतरे व सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकंवर यांनी या मेळाव्यात उपस्थित नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले. मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यानंतर कोरची पोलिस स्टेशन हद्दीतील ९४ शेतकरी बांधवांना धानपिकाचे बियाणे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात जय श्रीराम ३५ बॅग, एमटीयू १०१० च्या ३९, एमटीयू -११५३ च्या २० बॅग वाटप करण्यात आल्या. या मेळाव्यामध्ये व्हीईएलमार्फत विविय शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. यात सातबारा, ई-श्रम कार्ड, पॅन कार्ड, आयुष्मान भारत, केवायसी आदींचा समावेश होता. या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. या कार्यक्रमासाठी पोलिस विभागातील अधिकारी, अंमलदार मागील दोन आठवड्यांपासून परीश्रम घेत होते. पोलिसांनी गावोगवी जाऊन शेतकरी बांधवांना एकत्र आणले. त्यांना या मेळाव्याचा लाभ व्हावा, यासाठी पोलिसांनी सातत्याने जनजागृती केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकुवर तसेच पोलिस हवालदार हरीश मडावी, पोलिस शिपाई सतीश नाटेकर, पोलिस शिपाई भालेराव आदींनी सहकार्य केले. या कृषी मेळाव्याला कोरची पोलिस स्टेशनच्या हद्दीतील १०० ते १५० शेतकरी व नागरिक उपस्थित होते.