पोलीस अधीक्षक व प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई येथे सन्मानित
लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर, दि. 16: सर्वोच्च न्यायालय, रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार सन 2022-2023 च्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य केले असून चंद्रपूर जिल्ह्याने रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी करण्यात राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये एकूण 840 रस्ते अपघातात एकूण 434 मृत्यू तर सन 2023 मध्ये एकूण 791 रस्ते अपघातात एकूण 349 मृत्यू झालेत. सन 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 49 अपघात कमी आणि 85 मृत्यू कमी करण्यात यश आले आहे.
सन 2022 मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात एकूण 1 हजार 895 रस्ते अपघातात एकूण 371 मृत्यू तर सन 2023 मध्ये एकूण 1 हजार 473 रस्ते अपघातात एकूण 283 मृत्यू झालेत. तसेच सन 2022 मध्ये नवी मुंबईमध्ये एकूण 727 रस्ते अपघातात 293 मृत्यू झालेत तर सन 2023 मध्ये एकूण 755 रस्ते अपघातात एकूण 241 मृत्यू झालेत.
रस्ते अपघात कमी करण्यात चंद्रपूर राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपायोजना राबवून जिल्ह्यामधील रस्ते अपघात कमी केले आहेत. व नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन केल्याने चंद्रपूर जिल्ह्याला हा सन्मान मिळाला आहे, ही उल्लेखनीय बाब आहे.
अपघातावर नियंत्रणासाठी उपाययोजना:
सन 2022 मध्ये घडलेल्या रोड अपघाताचे रोड प्रकार,अपघाताच्या वेळा, अपघाताचे कारण पोलीस ठाणे याप्रमाणे घडलेल्या अपघाताचे विश्लेषण करण्यात आले. विश्लेषणावरून अपघातामध्ये पहाटे 4 ते 8 वाजेच्या दरम्यान रोड अपघाताची संख्या अधिक प्रमाणात असून धोकादायक ड्रायव्हिंग तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणे यावर नियंत्रण करण्यासाठी सन 2023 मध्ये मोटार वाहन कायद्यांतर्गत दारू पिऊन वाहन चालविणे, विना सिटबेल्ट आणि विना हेल्मेट वाहन चालविणे ही त्रिसूत्री मोहीम संपूर्ण जिल्ह्यात माहे डिसेंबर 2022 पासून राबविण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सन 2022 मध्ये विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या 9 हजार 258 वाहन चालकांवर कारवाई तर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या 14 हजार 390 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. सन 2023 मध्ये विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या 20 हजार 715 वाहन चालकांवर तर विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या 35 हजार 721 व्यक्तींवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस ठाणे व वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्रिसूत्री मोहीम सातत्याने राबविण्यात आली.
मोटर वाहन कायद्यातंर्गत कार्यवाही :
मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे केलेल्या कार्यवाहीत 2 हजार 373 प्रकरणात 2 कोटी 25 लक्ष 30 हजार इतका दंड आकारण्यात आला. रोडवर धोकादायक स्थितीत वाहन उभे करून ठेवणाऱ्या वाहन संदर्भात सन 2023 मध्ये एकूण 2 हजार 643 वाहनांवर कलम 283 भां.द.वी.प्रमाणे तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या 117 वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र अधिक प्रमाणात असून कोळसा तसेच इतर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने वाहनावर ताडपत्रीचा वापर करणे अनिवार्य आहे. यासाठी स्वतंत्र मोहीम राबवून 1 हजार 302 केसेस करण्यात आल्या. 31 डिसेंबर 2022 व 23 अपघात मुक्त ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यात राबवून प्रभावी त्रिसूत्री मोहीम राबविण्यात आली. परिणामी दोन्ही वर्षी अपघात मुक्त 31 डिसेंबर ठेवण्यात यश प्राप्त झाले.
आरटीओ व वाहतूक शाखेची संयुक्त मोहीम
यामध्ये अल्पवयीन चालकांवर कार्यवाही करून प्रत्यक्ष त्यांच्या पालकांना पाचारण करून त्यांना समुपदेशन करण्यात आले. भरधावपणे बुलेट चालविणाऱ्या युवकांविरुद्ध स्वतंत्र मोहीम राबवून प्रभावी कार्यवाही करण्यात आली. यामध्ये एकूण 81 बुलेट वाहने जप्त करण्यात आली. कर्कश आवाज करणारे वापरात असलेले सायलेन्सरचा नाश करण्यात आला.
व्यापक जनजागृती
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण शाळा, कॉलेज येथे भेटी देऊन वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यातील विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांमध्ये जाऊन वाहन चालकांना रस्ते सुरक्षाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. एनजीओ/वाहतूक शाखा/आरटीओ यांच्या संयुक्त माध्यमातून राज्य महामार्गावरील वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.
हा जिल्हा प्रशासनाचा सन्मान – किरण मोरे
सन 2023 मध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व समिती सदस्यनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले असून हा संपूर्ण चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा सन्मान आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रस्ता सुरक्षा या विषयाला विशेष महत्व व वेळ दिला. प्रसंगी कठोर भूमिका घेऊन सर्व कार्यकारी अधिकारी यांच्याकडून काम करून घेतले. त्यामुळेच जिल्ह्यात अपघातमृत्यू प्रमाण कमी झाले आहे. सन 2024 मध्ये सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील अपघात कमी होण्यासाठी अधिक चांगले काम करू, असे श्री मोरे यांनी म्हटले आहे.