विमाशि संघाचे प्रांतीय अधिवेशन थाटात संपन्न

0
100

शिक्षण आणि शिक्षकांसाठी संघटन मजबूत व्हावे : आमदार आमदार अडबाले 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 6 फेब्रुवारी : महाराष्ट्र सरकारने हिवाळी अधिवेशनादरम्यान स्वायत्त विद्यापीठाच्या संदर्भात ठराव पारित केला. शिक्षण क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण आणि शिक्षक यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि दबाव गट म्हणून पुढे येण्यासाठी संघटन मजबूत व्हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘प्रांतीय अधिवेशन २०२४’ उद्‌घाटन सोहळा तथा स्‍मरणिका प्रकाशन समारंभ पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्‍हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, उद्‌घाटक आमदार ॲड. अभिजीत वंजारी तर प्रमुख पाहुणे म्‍हणून आमदार धीरज लिंगाडे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, विमाशि संघ अध्यक्ष श्रावण बरडे, स्‍वागताध्यक्ष श्री जैन सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष राज पुगलिया, जगदीश जुनघरी, डॉ. शरयू तायवाडे, सौ. स्मिताताई वंजारी, सौ. सिमा अडबाले, सौ. पुष्पाताई डायगव्हाणे, सौ. उषाताई बरडे मंचावर उपस्थित होते.

मान्‍यवरांचे लेझीम पथक व एनसीसी विद्यार्थ्यांनी थाटात स्‍वागत केले. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षक संघटना अशा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेणारी “संघर्ष २०२४” स्‍मरणिकेचे मान्‍यवरांच्या हस्‍ते प्रकाशन करण्यात आले. स्‍मरणिकेचे संपादक प्रभाकर पारखी व लेखकांचा सत्‍कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, आमदार ॲड. अभिजीत वंजारी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, श्रावण बरडे यांचा सपत्‍नीक तर आमदार धीरज लिंगाडे, राज पुगलिया यांचा सत्‍कार करण्यात आला. आमदार ॲड. अभिजीत वंजारी, आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनीही शिक्षण क्षेत्रातील विविध समस्‍यांवर प्रकाश टाकला.

विदर्भातील राज्‍य पुरस्‍कार प्राप्‍त शिक्षक, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्‍य, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रिय पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय फ्लाॅरेन्‍स नाईटिंगेल पुरस्‍कारप्राप्‍त पुष्पा दत्तात्रय पाचभाई (पोडे) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला.

या समारंभाचे प्रास्‍ताविक विमाशि संघ अध्यक्ष श्रावण बरडे यांनी केले. तर संचालन सुनील शेरकी, संगीता शरद डांगे तर आभार श्रीहरी शेंडे यांनी मानले. या प्रांतीय अधिवेशनाला विदर्भातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here