लॅायड्सच्या लोहप्रकल्पाचा होणार विस्तार: नागरिकांनी केले स्वागत

0
46

– विविध सुविधा पुरविण्याची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २३ : उद्योगविहीन आणि बेरोजगारीने गांजलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच औद्योगिक विकासाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या लॅायड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लि.च्या कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी गुरुवार २३ जानेवारी रोजी जनसुनावणी पार पडली. विशेष म्हणजे विस्तारीकरणाअंतर्गत असलेल्या गावांतील नागरिकांनी लॅायड्सच्या लोहप्रकल्प विस्तारीकरणाचे एकमताने स्वागत केले. सोबतच स्थानिकांना रोजगार व आरोग्य, शिक्षणासारख्या महत्त्वाच्या सुविधा पुरवण्याची मागणी कंपनीकडे केली.
लॅायड्सच्या लोहप्रकल्प विस्तारीकरणाची ही पर्यावरणविषयक जनसुनावणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोनसरी येथील प्रकल्पस्थळी गुरुवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.या जनसुनावणीसाठी लाॅयड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डाॅ. देवराव होळी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उप प्रादेशिक अधिकारी उमाशंकर भदुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोनसरी येथील स्टील प्लान्टचे विस्तारीकरण करून तो २ बाय ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), १० दशलक्ष टन प्रतिवर्ष थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट आणि २ बाय ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष आयरन ओर पेलेट प्लान्ट, तसेच इंटेग्रेटेड स्टील प्लान्ट (४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता) एवढा वाढविण्याकरिता ही जनसुनावणी घेण्यात आली. कोनसरी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी या सुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी करताना माओवादग्रस्त असलेल्या जिल्ह्यात कंपनीमुळे विकासाचा सूर्य उगवल्याचे सांगितले. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत अनेकांनी आपले सकारात्मक मत मांडले. उद्योगाचा विस्तार होताना प्रदूषण वाढू नये याकरिता कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यासह, सांडपाणी व्यवस्थापनाच्या सोयीचे कौतुक केले. मात्र उद्योगातून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये व त्याचा त्रास जनसामान्यांना होऊ नये,यासाठी विशेष काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्याच्या सुरजागड खाणीतून निघालेल्या लोहखनिजावर हा प्रकल्प आधारीत असल्याने येथे स्थानिकांनाच रोजगार द्यावा, प्रकल्पबाधित होत असलेल्या गावांना योग्य मोबदला देऊन या गावांचा मॉडल व्हिलेज अर्थात आदर्श आधुनिक, सर्व सुविधायुक्त गावांप्रमाणे विकास करावा, सर्व प्रकल्पबाधित गावांना सर्वच प्रकारच्या सुविधा द्याव्या, मल्टिस्पेलिटी हॉस्पिटलची निर्मिती करावी, सीबीएससी अभ्यासक्रमाची शिक्षणाचा उत्तम दर्जा असलेली शाळा निर्माण करावी, पर्यावरणविषयक आवश्यक सर्व योग्य उपाययोजना कराव्या, जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक भरपाई देतानाच कंपनीचे शेअर द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात आजवर माओवाद्यांच्या भितीने कुणीच उद्योग उभारण्याची हिंमत केली नाही. पण या कंपनीने साहसी पाऊल उचलत जिल्ह्यात उद्योगाच्या रूपात विकासाची पहाट आणली. हजारो रिकाम्या हातांना काम दिले, शंभर, दोनशे रुपयांच्या मजुरीसाठी परप्रांतात खस्ता खाणारे अनेकजण आता कंपनीत रोजगार मिळाल्याने सुखी झाले. हजारो कुटुंबांना सुखाचे दिवस आले. त्यामुळे आम्ही कंपनीच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे स्वागत करतो. पण त्यांनी आमच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण कराव्या, असाच एकूण जनसुनावणीतील नागरिकांच्या विचारांचा सूर होता. यावेळी विचार व्यक्त करताना माजी खासदार अशोक नेते म्हणाले की, गडचिरोलीचा कायापालट व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसण्याचे काम लाॅयड्सने केले आहे. गडचिरोली जिल्हा आता विकासाचे नवे मॉडेल बनेल. गडचिरोली जिल्हा भविष्यात “पोलाद सिटी” म्हणून ओळखला जाईल. प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील व गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने होईल, असेही ते म्हणाले. आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांनीही कंपनीमुळे जिल्ह्यातील बेरोजगारीची समस्या सुटत असून उद्योगातील सांडपाणी व इतर अनावश्यक बाबींची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उत्तम दर्जाची ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील बेरोजगार तरुणाईला रोजगार द्यावा. कुणी अकुशल असतील तर त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन कंपनीत सामावून घेण्याची गरज असल्याचे म्हटले. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनीही लाॅयड्स कंपनीमुळे जिल्ह्यात समृद्धी आल्याचे सांगत येथील पोलाद निर्मितीमुळे जगात देशाची पोलादी देश अशी प्रतिमा निर्माण होईल, असे सांगितले. पद्मश्री डाॅ. परशुराम खुणे यांनीही उद्योगविहीन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील या एकमेव उद्योगाचा विस्तार झाल्यास जिल्ह्यात विकास, सुख, समृद्धीचाही विकास होईल, असे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. या जनसुनावणीला पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान खासदार डाॅ. नामदेव किरसान यांनीही जनसुनावणीला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासंदर्भात कंपनी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here